Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ७४ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. गाझामध्ये आतापर्यंत १९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु हे युद्ध इतक्या लवकर संपणार असे दिसत नाही. गाझामध्ये सुरू असलेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिके दरम्यान इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, युद्ध संपायला वेळ लागेल. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.
याआधीही गॅलंट यांनी असेच वक्तव्य केले होते. इस्रायल सध्या गाझामधील युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे यावरून दिसून येते. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, गाझामधील युद्ध अनेक महिने सुरू राहील. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी असेही म्हटले आहे की इस्रायल जोपर्यंत हमासला पूर्णपणे नष्ट करत नाही आणि त्यांच्या ओलीसांची सुटका करत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवेल.
७४ दिवस युद्ध चालू!
गाझामध्ये अडीच महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध कधी थांबेल हे सांगणे कठीण आहे. गाझामध्ये आतापर्यंत १९०० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. हमासच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायल गाझावर सातत्याने बॉम्बहल्ले करत आहे. हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये १२०० हून अधिक लोक मारले गेले होते.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझामधील इस्रायली कारवाया कमी करण्याबाबत चर्चा केली. ऑस्टिन आणि इतर यूएस अधिकाऱ्यांनी गाझामधील मोठ्या संख्येने नागरिकांच्या मृत्यूबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे, परंतु युद्धविरामाच्या वाटाघाटी केलेल्या नाहीत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणाले की, ही इस्रायलची कारवाई आहे. मी डेडलाइन किंवा अटी सेट करण्यासाठी येथे आलेलो नाही. अमेरिकन अधिकार्यांनी हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे, सुरुंग नष्ट करणे आणि ओलिसांची सुटका करण्याच्या उद्देशाने 'कंट्रोल्ड ऑपरेशन्स'चे आवाहन केले आहे.