काँगोमध्ये तीन मुलांमध्ये एक विचित्र आजार आढळून आला आहे. जेव्हा या आजाराची तपासणी करण्यात आली तेव्हा असं आढळून आलं की आतापर्यंत या आजारामुळे ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बहुतेक प्रकरणांमध्ये ताप, उलट्या आणि इंटरनल ब्लीडिंग ही लक्षणं दिसून आली आहेत. ४८ तासांच्या आत लोकांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे.
५३ जणांचा मृत्यू
इंटरनल ब्लीडिंगशी संबंधित लक्षणं तापाची आहेत जी सामान्यतः इबोला, डेंग्यू, मारबर्ग यांसारख्या व्हायरसशी संबंधित असतात. परंतु आतापर्यंत गोळा केलेल्या अनेक नमुन्यांच्या चाचण्यांच्या आधारे संशोधकांनी हे नाकारलं आहे. २१ जानेवारी रोजी काँगोमध्ये या आजाराचे नवीन रुग्ण आढळू लागले. ज्यामध्ये ४१९ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आणि ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
तीन मुलांनी खाल्लं वटवाघुळ
जागतिक आरोग्य संघटनेच्या आफ्रिका कार्यालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, बोलोको गावातील तीन मुलांनी वटवाघुळ खाल्लं होतं. ज्यामुळे ४८ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. वन्य प्राण्यांच्या खाद्यपदार्थांमुळे प्राण्यांमधून मानवांमध्ये हा रोग पसरू शकतो. त्यामुळे चिंता वाढली आहे. २०२२ मध्ये WHO ने म्हटलं होतं की गेल्या दशकात आफ्रिकेत अशा प्रकारच्या साथीच्या आजारांची संख्या ६०% पेक्षा जास्त वाढली आहे.
९ फेब्रुवारी रोजी बोमेटे गावात या गूढ आजाराचा प्रकोप सुरू झाल्यानंतर, १३ जणांचे नमुने काँगोची राजधानी किन्शासा येथील राष्ट्रीय बायोमेडिकल संशोधन संस्थेत चाचणीसाठी पाठवण्यात आले. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, काही रुग्णांचे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. मलेरियासाठीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या वर्षी काँगोच्या दुसऱ्या भागात अनेक लोकांचा बळी घेणारा आणखी एक गूढ फ्लूसारखा आजार आढळून आला.