रबात : आफ्रिकेतील अत्यंत महत्त्वाच देश असलेल्या मोरोक्कोमध्ये (Morocco) ८ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने (Earthquake) मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपानंतर ४८ तास उलटूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हजारो जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. अल जजीराने दिलेल्या माहितीनुसार, मोरोक्कोमध्ये ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच, मोरोक्कन सैन्याच्या निवेदनानुसार, किंग मोहम्मद VI यांनी सशस्त्र दलांना विशेष शोध आणि बचाव पथके आणि सर्जिकल फील्ड हॉस्पिटल तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतांना हादरवणाऱ्या भूकंपाच्या केंद्राच्या सर्वात जवळ असलेल्या मराकेशमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले आहे. परंतु सर्वाधिक मृत्यू अल-हौज आणि तरौदंत प्रांतांच्या दक्षिणेकडील पर्वतीय भागात नोंदवले गेले आहेत. शोध आणि बचाव पथके ढिगारा हटवण्यात आणि रस्ते मोकळे करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, दक्षिणेकडील सिदी इफ्नीपासून उत्तरेकडील रबात आणि पलीकडे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू मराकेशच्या पश्चिमेला ७२ किलोमीटर अंतरावर होता, मराकेश एक प्रमुख आर्थिक केंद्र शहर आहे. तुर्कीच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग (AFAD) ने म्हटले आहे की, मोरोक्कोकडून आपत्कालीन इशारा मिळाल्यास त्यांनी वैद्यकीय, मदत, शोध आणि बचाव संस्थांच्या २६५ सदस्यांना अलर्ट केले आहे. तसेच, रबातमधील अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर, मोरोक्कोला नेण्यासाठी एक हजार तंबू वाटप करण्यात आले आहेत. दरम्यान, १९६०नंतरचा मोरोक्कोतील हा सर्वात भीषण आणि भयानक भूकंप आहे. या भूकंपात होत्याचे नव्हते झाले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्कोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर (X) लिहिले की, "मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल शोक. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे."