मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोतील एक भूमिगत रेल्वे (मेट्रो) मंगळवारी रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात वीस प्रवासी ठार तर अनेक जखमी झाले. रशियाच्या राष्ट्रीय टीव्हीने मेट्रो दुर्घटनेचे फुटेज दाखवले. अचानक ब्रेक लागल्याने प्रवासी खाली पडल्याचे शहरातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मदत आणि बचावकार्य सुरू असून आणखी पाच प्रवासी अडकले असण्याची शक्यता आहे. या अपघातात शंभरहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.शहराच्या पश्चिम भागातील पार्क पोबेडी मेट्रो स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला दुर्घटना स्थळाजवळ अनेक हेलिकॉप्टर व रुग्णवाहिका दिसून आल्या. मला वाटले आता सर्व काही संपले, असे एका बचावलेल्या प्रवाशाने रोसिया २४ या सरकारी टीव्हीला सांगितले. आम्ही अडकून पडलो होतो आणि केवळ चमत्कारानेच आमची सुटका होऊ शकली, असेही हा प्रवासी म्हणाला. दुर्घटनास्थळी ६० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून गंभीर जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलविण्यात येत आहे, असे उपमहापौरांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मॉस्कोतील मेट्रोला अपघात; २० ठार
By admin | Published: July 16, 2014 2:22 AM