मॉस्को : कोरोना साथीमुळे आयुष्यात वाढलेला प्रचंड तणाव कमी करण्यासाठी मॉस्को शहरातील जनतेने गेल्या आठवड्याच्या अखेरीस स्केटिंगचा आनंद लुटला. काही निर्बंध पाळून शहरानजीकच्या विविध क्लबमधील बर्फाळ ठिकाणी स्केटिंग करण्यास रशिया सरकारने मॉस्कोवासीयांना परवानगी दिली होती.
हिवाळ्यामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीने मॉस्कोसहित रशियाच्या अनेक भागांतले रुपडेच पालटून जाते. या मोसमात दरवर्षी स्केटिंग व इतर हिमक्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. त्यात हजारो लोक सहभागी होतात; पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे या सगळ्याच गोष्टींवर गदा येणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र, नागरिकांच्या आयुष्यातला आनंद हिरावून न घेता रशिया सरकारने मॉस्को परिसरातील स्केटिंग क्लबमध्ये या क्रीडा प्रकाराचा मोजक्या लोकांना आनंंद लुटण्याची परवानगी दिली. त्याचा पुरेपूर लाभ उठवीत मॉस्कोवासीयांनी आपल्या स्केटिंग कौशल्याचे अनोखे दर्शन घडविले. लोकांची संख्या कमी असल्याने स्केटिंग करणाऱ्यांना वावरण्यासाठी अधिक मोकळी जागा मिळाली होती. स्केटिंग करणाऱ्या सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. स्केटिंगच्या ठिकाणी क्यूआर कोडच्या मदतीनेच प्रवेश देण्यात येत होता.
अंटार्क्टिकाचा उभारला देखावा२७ जानेवारी १८२० रोजी रशियातील संशोधकांनी अंटार्क्टिकाचा शोध लावला. त्याला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. त्या घटनेची आठवण म्हणून मॉस्कोजवळील एका स्केटिंग क्लबमध्ये अंटार्क्टिकाचा देखावा तयार करण्यात आला आहे.