संयुक्त राष्ट्रे : भारत, पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. त्यापैकी भारतात (२३.४ कोटी), पाकिस्तान (९.३ कोटी), इथिओपिया (८.६ कोटी), नायजेरिया (७.४ कोटी), काँगो (६.६ कोटी) गरीब लोक आहेत. जगात १.१ कोटी लोक गरिबीने पिचून निघाले आहेत. त्यात निम्मे प्रमाण मुलांचे आहे. अशांपैकी ४० टक्के मुले युद्धग्रस्त तसेच सामाजिक, राजकीय स्थिती अतिशय नाजूक असलेल्या देशांमध्ये राहत आहेत.
संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यूएनडीपी) व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दारिद्र्य, मानवी विकास विषयक विभागाने तयार केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, गरिबांपैकी ८३ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. आफ्रिकेचा काही भाग व दक्षिण आशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यासह दहा मापदंडांचा वापर करून बहुआयामी गरिबी निर्देशांकांबाबतचे अहवाल संयुक्त राष्ट्रे व ऑक्सफर्ड विद्यापीठ २०१०पासून तयार करत आहे. यंदाच्या अहवालात ११२ देशांतील गरिबीचा आढावा घेण्यात आला. या देशांतील एकूण लोकसंख्या ६.३ अब्ज आहे. गरिबीत जगणाऱ्या लोकांपैकी निम्मे प्रमाण मुलांचे असून ते १८ वर्षांहून कमी वयोगटातील आहेत.
११.७ कोटी लोकांनी जीव वाचविण्यासाठी केले पलायनदुसऱ्या महायुद्धानंतर जगात सर्वाधिक संघर्ष २०२३मध्ये उफाळून आला. त्यात नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांचीही भर पडली. या कारणांमुळे त्यावर्षी ११.७ कोटी लोकांना जीव वाचविण्यासाठी स्वत:ची घरेदारे सोडून पलायन करावे लागले होते. जगातील ४५.५ कोटी गरीब लोकांना पोषक आहार, पाणी, स्वच्छता, वीज, शिक्षण आदी मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.