शिकागो : आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. हिंदू समाज एकसंघ राहिल्यास समाजाची प्रगती होईल, असा दावाही त्यांनी केला.शिकागो येथे भरलेल्या वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये ते बोलत होते. वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणला १२५ वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, हिंदूंच्या एकजुटीमुळे समाजबांधणीला नवी दिशा मिळू शकेल. हिंदू कोणाचाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत, असेही त्यांनी बोलून दाखवले. हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे हीच एक समस्या आहे, असे सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू समाजावर हजारो वर्षे अन्याय होत राहिल्याची तक्रार केली. हिंदू समाज आपली मूल्ये, सिद्धांत विसरल्यामुळेच असे घडले, असे सांगून ते म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंना विरोध करीत असतात. तसे होऊ नये, यासाठी आपणच एकत्र यायला हवे.भारतात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध या कार्यक्रमात करू पाहणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसणे व गोंधळ करणे या कारणास्तव अटक केलेल्या दोघा महिलांना नंतर सोडून दिले. त्यांनी नावे न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात धार्मिक अल्पसंख्य गटांवर जो अन्याय होत आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. (वृत्तसंस्था)>वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये उपराष्ट्रपतींचेही भाषणपरिषदेत जगभरातील विविध हिंदू संघटनांचे सुमारे २,५00 मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचेही परिषदेत भाषण होणार आहे. रा. स्व. संघाचे आणखी ६ पदाधिकारी परिषदेसाठी आले आहेत. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंतर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
सर्वाधिक प्रतिभावंत लोक हिंदू समाजातच; एकत्र येणे गरजेचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 4:13 AM