लाहोर - भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदने पाकिस्तानात स्वत:चे लष्कर उभारले आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार लवकरच सईदचे हे खासगी लष्कर कार्यरत होणार असून या पथकातील सर्वांचे लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. महत्वाचं म्हणजे पाकिस्तानात स्वत:च लष्कर उभारणारा सईद एकटा नसून अनेकांनी अशा प्रकारे स्वत:चे खासगी लष्कर उभे केले आहे.
ही सर्व लष्कर युनायटेड जिहाद काऊंसिलच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. पाकिस्तनची गुप्तचर संघटना आयएसआयने युनायटेड जिहाद काऊंसिलची स्थापना केली. सर्व भारतविरोधी गटांना एकत्र आणण्याच्या हेतूने युनायटेड जिहाद काऊंसिलची स्थापना करण्यात आली होती.
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद सध्या राजकीय प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. हाफिजच्या जमात उद दावाचे आज पाकिस्तान सरकारसमोरच आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात सईदच्या मिली मुस्लिम लीगला राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यास मान्यता देऊ नये अशी विनंती केली आहे.
राजकीय पक्ष म्हणू मान्यता देण्याचा मिली मुस्लिम लीगचा अर्ज पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने यावर्षी ऑक्टोंबरमध्ये फेटाळल्यानंतर सईदने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने हाफिजच्या पक्षाला मंजुरी देण्यास नकार दिला.
काही दिवसांपूर्वी सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला होता. मशरिकी पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) चा सूड घ्यायचा असेल तर काश्मीर हा त्यासाठीचा मार्ग आहे. सूड घेण्यासाठी काश्मीरमधून आपण वाट काढू, असं हाफिज सईदने म्हंटलं आहे. लाहोरमध्ये झालेल्या सभेत तो बोलत होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी हाफिज सईदला दहशतवादी घोषित केलं आहे. तर दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच नजरकैदेतून त्याची सुटका केली आहे.