ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 12 - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याने अनेक नागरिकांना धक्का बसला असून त्यांचा विजय पचवणे कठीण जात आहे. ट्रम्प विरोधकांनी त्यांचा विजय खूपच मनावर घेतला आहे. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत ट्रम्प यांना मत देणं 10 वर्षीय अफ्रिकन अमेरिकन मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. ट्रम्प यांना मत दिल्याच्या रागात त्याच्या आईने त्याला घराबाहेर हाकलून काढलं आहे. याचा व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला असून व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये मुलाची आई ट्रम्प यांना का दिलं विचारत असून घराबाहेर काढताना दिसत आहे. मुलगा रडून विनवण्या करत असतानाही आईने मात्र आपला निर्णय मागे घेतला नाही. इतकंच नाही तर मुलाची बॅगही सामान भरुन तयार ठेवण्यात आली होती.
निवडणूक पद्धत मुलांना समजावी यासाठी शाळेत निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी या मुलाने डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिलं होतं. मात्र मुलाच्या आईने हे मतदान जरा जास्तच मनावर घेतलं आणि सरळ त्याला घराबाहेर काढलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अनेक नागरिक रस्त्यावर उतरले असून ऑनलाइन पद्धतीने देखील विरोध केला जात आहे. या घटनेवरुन नागरिकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे किती संताप आहे हे मात्र लक्षात येत आहे.