ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. १५ - गरीब, रुग्ण व अनाथांच्या सेवेत आयुष्य वेचणा-या मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला संतपद बहाल करण्यात येणार आहे. ख्रिश्चनांच्या सर्वोच्च धर्मपीठाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी ही घोषणा केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या दुस-या ‘मेडिकल मिरॅकल’ला (चमत्कार) मान्यता दिली होती त्यामुले तेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संतांबाबत चर्चचे खास कायदे आहेत. त्यानुसार एखादी व्यक्ती कितीही संतासारखे जीवन जगलेली असली तरी तिला संत मानता येत नाही. त्यासाठी तिच्या खात्यावर किमान दोन चमत्कारांची नोंद असावी लागते. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते.
अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे पहिला ‘चमत्कार’ झाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती. २००३ मध्ये एका सोहळ्यात पोप जॉन पॉल द्वितीय यांना तेरेसा यांच्या पहिल्या चमत्काराला मान्यता दिली होती. दुसरा चमत्कार ब्राझीलचा आहे. मदर तेरेसा यांनी एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे. तेरेसा यांच्या आधीच्या प्रार्थनांच्या परिणामस्वरूप एक व्यक्ती चमत्कारिकरीत्या ठीक झाली होती. मदर तेरेसा यांनी ८७ वर्षांच्या असताना १९९७ मध्ये कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेरेसा यांनी गरिबांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.