डिज्नी वर्ल्डमध्ये एक कपल आपल्या मुलाला घेऊन मौजमजा करण्यासाठी आलं होतं. तेथे विविध प्रकारचे पाळणे, राईड्स बसवले आहेत. मुलाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब एका रोलर कोस्टरवर गेलं. रोलर कोस्टर जलद गतीने फिरतो आणि हा अनुभव अतिशय रोमांचक असतो.
रोलर कोस्टर सुरू झाल्यानंतर अवघ्या २० सेकंदात कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कारण ५ वर्षांच्या मुलाचा श्वासोच्छवास अचानक थांबला आणि त्याला कार्डिएक अरेस्ट आला. ही घटना त्या कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक होती. यानंतर मुलाच्या आईने आरडाओरडा सुरू केला आणि रोलर कोस्टर थांबवण्यात आलं
फ्लोरिडामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. येथील वॉल्ट डिज्नी वर्ल्डमध्ये एक चिमुकला आपल्या पालकांसह मजा करायला गेला होता. पण रोलर कोस्टरवर मजा करणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. मुलाच्या आईने सांगितलं की, आम्ही मुलासह रोलर कोस्टरवर बसलो होतो. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावू लागली. तो बेशुद्ध झाला. श्वासही घेत नव्हता.
रोलर कोस्टर थांबताच मुलाची आई क्रिस्टी यांनी मुलाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. यानंतर डिज्नीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत केली आणि मुलाला हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर मुलावर तातडीने उपचार सुरू झाले आणि त्याचं हृदय पुन्हा काम करू लागलं.
यानंतर मुलाला तीन वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आले. विविध चाचण्या घेण्यात आल्या आणि त्याला कॅटेकोलामिनर्जिक पॉलीमॉर्फिक व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया (CPVT) या दुर्मिळ हृदयविकाराचं निदान झालं. अशा परिस्थितीत जर जास्त उत्साह किंवा हालचाली असतील तर कार्डिएक अरेस्ट येऊ शकतो.
हा मुलगा फक्त ५ वर्षांचा होता आणि तो १०० किलोमीटर प्रतितास वेगाने फिरणाऱ्या रोलर कोस्टरमध्ये बसला होता. त्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली आणि त्याला कार्डिएक अरेस्ट आला. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.