चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात झालेल्या जीवितहानीच्या कटू आठवणी मानव समुहाच्या आठवणीत आहेत. लोकांमध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती आणि शास्त्रज्ञांनी विकसित केलेली लस यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आपल्या आसपास असे अनेक विषाणू आहेत, जे अधिक सक्रिय झाल्यास जगभरात धुमाकूळ घालू शकतात. सध्या जगावर एमपॉक्स नावाच्या विषाणूचं संकट घोंघावत आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावाने ओळखला जात होता. या विषाणूला आता जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.
एमपॉक्समुळे कांगोसह १३ आफ्रिकन देशांमध्ये अनेक रुग्ण सापडत आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ५२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉन घेब्रायसेस यांनी एमपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयएचआर आपातकालीन समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, मागच्या तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा एमपॉक्स हा आणीबाणीच्या स्थितीपर्यंत पोहोचला आहे.
त्यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना आफ्रिकेमध्ये एमपॉक्सचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. कांगो आणि आफ्रिकेतील इतर देशांमध्ये एमपॉक्सचा वाढत्या प्रचाराचं मूल्यांकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विनियमांनुसार एक आपातकालीन समिती बोलावण्यात येत आहे. गुरुवारी या समितीने बैठक घेतली. तसेच एमपॉक्सबाबत जी स्थिती आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीसारखी आहे, असा सल्ला मला दिला. समितीने दिलेला हा सल्ला मी स्वीकारला आहे, असे घेब्रायसेस यांनी सांगितले.