नवी दिल्ली- मुगल काळातील एका दुर्मिळ रत्नहाराचा लिलाव ख्रिस्तीतर्फे बुधवारी जिनिव्हा येथे होत आहे. या रत्नहारावर मुगल बादशहा अकबर व जहांगीर यांची नावे कोरलेली आहेत. तसेच या लिलावात जगातील सर्वांत मोठ्या निर्दोष नीलमण्याचाही लिलाव होत असून, या लिलावातून ८ कोटी अमेरिकी डॉलर मिळतील, असे अपेक्षित आहे. लिलावकर्त्या कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅग्निफिसंट ज्वेल्स या नावाने केल्या जाणार्या विक्रीत १७ व्या शतकातील सात मुगलकालीन रत्नहार आहेत. त्यावर बादशहांची नावे कोरण्यात आलेली आहेत. यांची किंमत १ लाख ५० हजार डॉलरपासून, २० लाख डॉलरपर्यंत अपेक्षित आहे. मुगल बादशहांना रत्नांचे आकर्षण होते. मुगलांचे पूर्वज तिमुरिद यांच्या कालावधीपासून रत्नहारांवर नाव कोरण्याची प्रथा चालू होती. मुगल बादशहा आपल्याकडील हिरा, पन्ना अशा मौल्यवान रत्नावर आपले नाव कोरत असत व ही रत्ने हारात जडविली जात असत. हे रत्नहार साम्राज्याच्या समृद्धीचे प्रतीक होते, तसेच सुरक्षेसाठी त्यावर ताईतही बांधले जात असत. कतार येथील इस्लामिक कला संग्रहालयात एक रत्नहार असून त्यात ११ मुगलकालीन रत्ने जडविण्यात आली आहेत. त्यांचे एकूण वजन ८७७.२३ कॅरट असून, या रत्नापैकी तीन रत्नावर मुगल बादशहा जहांगीर व एका रत्नावर शहेनशहा शहाजहान याचे नाव आहे. मॅग्निफिसंट ज्वेल्स या लिलावात जगातील सर्वांत मोठ्या निर्दोष नीलमण्याचाही लिलाव होणार आहे. द ब्लू असे नाव असलेल्या या रत्नाची किंमत २ कोटी १० लाख ते २ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर अपेक्षित आहे. या लिलावात एकूण २५० वस्तू विकल्या जाणार आहेत. त्यात नीलमणी सर्वाधिक किंमतीचा आहे. सहा महिन्यांपूर्वी ख्रिस्तीने द ऑरेंज नावाच्या केशरी हिर्याची विक्री ३५.५ दशलक्ष डॉलरला केली होती. ही केशरी हिर्याला मिळालेली सर्वाधिक किंमत आहे. या लिलावात नोबल ज्वेल्स नावाची एक श्रेणी असून, त्यात नैसर्गिक मोत्यांचे तसेच हिर्यांचा एक हार असून, तो प्रशियाची महाराणी एलिझाबेथच्या खाजगी संग्रहातील आहे. त्याची किंमत ५ लाख ते ७ लाख अमेरिकी डॉलर आहे.
मुगलकालीन रत्नहाराचा लिलाव
By admin | Published: May 13, 2014 6:13 PM