काबूल : अतिरेक्यांविरुद्धची विदेशींनी सुरू केलेली कारवाई संपेपर्यंत मुल्ला ओमरचा मृत्यू आम्हाला जाहीर होऊ द्यायचा नव्हता, असे तालिबानने मंगळवारी मान्य केले. मुल्लाच्या मृत्यूची बातमी तालिबानने तब्बल दोन वर्षे जाहीर होऊ दिली नव्हती.मुल्ला ओमरचा मृत्यू केव्हा झाला हे स्पष्ट न सांगता तालिबानने गेल्या जुलैमध्ये त्याच्या निधनाला दुजोरा दिला. मुल्ला हयात नसतानाही त्याच्या नावाने निवेदने जाहीर होत होती असा आरोप अनेक बंडखोरांनी केला असल्यामुळे तालिबानांमधील गटबाजी अधिक वाढली आहे. तालिबानचा प्रमुख म्हणून मुल्ला अख्तर मन्सूर याची नियुक्ती झाली असून त्यावरून तालिबानमध्ये निर्माण झालेले द्वेषाचे वातावरण निवळण्यासाठी मन्सूरच्या भल्या मोठ्या आत्मचरित्रात मुल्ला ओमरचा मृत्यू लपविण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे. हे आत्मचरित्र पाच भाषांमध्ये तालिबानच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे व त्यात एप्रिल २०१३ मध्ये मुल्ला ओमर मरण पावल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या गुप्तचरांनी मुल्ला ओमर एप्रिल २०१३ मध्येच मरण पावल्याचा दावा केला होता. हे आत्मचरित्र ५ हजार शब्दांचे आहे. मुल्लाच्या मृत्यूमुळे तालिबानचे अपरिमित नुकसान झाल्यामुळे काही मोजक्याच सहकाऱ्यांपर्यंत त्याच्या मृत्यूची माहिती मर्यादित ठेवण्याचा निर्णय तालिबानी परिषदेच्या सात सदस्यांनी घेतला होता. (वृत्तसंस्था)
मुल्ला ओमरचा मृत्यू लपविला
By admin | Published: August 31, 2015 11:18 PM