वॉशिंग्टन : अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात आठ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून शुक्रवारी एफबीआय आणि मिल्वॉकी काउंटी पोलीस कार्यालयाने ट्विट केले की, त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
ज्यावेळी आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा हल्लेखोराने तेथून पळ काढला होता, असे वाउटोसा पोलीस विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. या गोळीबारात एका लहान मुलासह सात जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी हल्लेखोर 20 ते 30 वयोगटातील असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार अनेक मॉल कामगार इमारतीत लपले होते. दुकानदार जिल वोले यांनी एका स्थानिक न्यूज स्टेशनला सांगितले की, ज्यावेळी गोळीबार सुरू झाला, त्यावेळी ते आपल्या 79 वर्षाच्या आईसोबत दुकानात होते.
दुकानदार आणि घटनास्थळी असलेले ग्राहक या हिंसक घटनेचा बळी ठरल्यामुळे ते निराश आणि संतप्त आहेत, असे मॉल ऑपरेटर ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, या घटनेची वाउटोसा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. या घटनेच्या तपासासाठी आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत आहेत, असेही मॉल ऑपरेटर ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या निवेदनात म्हटले आहे.