न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानी, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी, तसेच मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्कीला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करत याला काळ्या यादीत टाकले आहे. भारत-अमेरिकेच्या संयुक्त प्रस्तावावर चीनने आपला नकाराधिकार उठवल्यानंतर संयुक्त राष्ट्राने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. सात महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव रोखणाऱ्या चीननेही अखेर भारत-अमेरिकेची साथ दिल्यामुळे हा भारताचा पाकवर मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.
सुरक्षा परिषदेच्या समितीने ६८ वर्षीय मक्की याला सोमवारी त्यांच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले. भारत आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता मक्कीची मालमत्ता गोठवून त्याच्यावर प्रवास आणि शस्त्रास्त्रे बंदी लादली जाणार आहे.
हाफिजचा मेहुणा...
चीनने १६ जून २०२२ रोजीच्या प्रस्तावावर आपला नकाराधिकार वापरून तो हाणून पाडला होता. मक्की हा पाकिस्तानातील जमात उल दावा आणि लष्कर-ए-तैयबा या जुळ्या संघटनांचा राजकीय घडामोडी शाखेचा प्रमुख असून तो लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज मुहम्मद सईदचा मेहुणा आहे.
चीनचे दशकभर अडथळे
- मे २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर केले, तेव्हा तो संयुक्त राष्ट्रात भारताचा एक मोठा राजनैतिक विजय मानला गेला होता. या विषयावर भारताने अझहरला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रयत्नात तब्बल दहा वर्षे चीनने नकाराधिकार वापरून अनेकदा खोडा घातला होता.
- २००९ मध्ये भारताने पहिल्यांदा अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर २०१६ आणि २०१७ मध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने एकत्रितपणे असेच प्रयत्न केले, परंतु सर्व प्रसंगी चीनने आडकाठी आणली.
कारणे काय? : मक्की आणि इतर लष्कर-ए-तैयबाचे सदस्य भारताविरुद्ध निधी उभारण्यात, दहशतवादी भरती करण्यात आणि तरुणांना हिंसाचारासाठी कट्टरपंथी बनवण्यात, जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्यांचे नियोजन करण्यात गुंतले आहेत, असे कारण निर्बंध लादण्यासंदर्भात देण्यात आले आहे.