दुबई : बेट्टी रिटा फर्नांडिस (४२) या मूळच्या मुंबईच्या महिलेचा काही दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात कुल्ह्याचे हाड बदलण्याच्या (हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या कथित गुंतागुंतीमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.दोन मुलांची आई असलेल्या फर्नांडिस व्यवसायाने शेफ होत्या व दुबईत त्या ‘बेट्टीज््् केक टेल्स’ नावाचे खास प्रकारचे वाणसामान विकण्याचे दुकान चालवीत असत. ‘गल्फ न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील अल जाहरा रुग्णालयात ९ मे रोजी फर्नांडिस यांच्यावर शस्त्रक्रिया झाली व त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.याला दुजोरा देताना रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहायेम अब्देलघनी यांनी निवेदनात म्हटले की, या घटनेची सर्व माहिती सरकारच्या नियामक संस्थांना देण्यात आली असून, त्यांच्याकडून स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे.मृताच्या कुटुंबियांनाही सर्व माहिती वेळोवेळी पारदर्शी पद्धतीने दिली जात आहे.आरोग्य विभागाच्या नियामक आयोगाचे प्रमुख मारवान अल मुल्ला म्हणाले की, फर्नांडिस यांच्या पतीने याविषयी आमच्याकडे रीतसर तक्रार केली असून, यात डॉक्टरांकडून काही हलगर्जीपणा झाला का याची तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. (वृत्तसंस्था)
मुंबईच्या महिलेचा दुबईत शस्त्रक्रियेनंतर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 4:55 AM