ऑनलाइन लोकमत -
ढाका, दि. 07 - हिंदू पुजा-याची क्रूरपणे हत्या केल्याची घटना बांगलादेशमध्ये घडली आहे. 65 वर्षीय अनंत गोपाल गांगुली मंदिरात जात असताना दुचाकीवरुन आलेल्या 3 हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने अनंत गांगुली यांच्या गळ्यावर वार करत क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. मुस्लिमांची बहुसंख्या असलेल्या बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यात अल्पसंख्यांकावर तसंच धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
अनंत गोपाल गांगुली सकाळी 9.30 वाजता मंदिरात चालले होते. त्यावेळी दुचाकीवरुन 3 हल्लेखोर आले आणि अनंत गांगुली यांच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत त्यांची हत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक गोपीनाथ कांजीलाल यांनी दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पद्दतशीरपणे योजना आखत अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते, परदेशी नागरिक आणि विचारवंतांवर हल्ले केले जात आहेत.
रविवारी ख्रिश्चन व्यवसायिकाची चर्चजवळ हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस अधिका-याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एप्रिल महिन्यात इसीसच्या दहशतवाद्यांनी उदारमतवादी प्राध्यापकाची त्याच्याच घराजवळ गळा कापून हत्या केली होती. आणि त्याच महिन्यात हिंदू टेलरचीही इसीसने त्याच्याच दुकानाजवळ हत्या केली.
इसीस आणि अल-कायदाने काही हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली आहे. मात्र बांगलादेश सरकार आपल्या देशात दहशतवादी संघटनांचं अस्तित्व नसल्याचा दावा करत आहे.