कराची - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सोमवारी घटिकी जिल्ह्याच्या डहारकी शहरापासून 2 किमी अंतरावर राहणाऱ्या दहर समुदायातील प्रभावी व्यक्तींनी एका हिंदू व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, व्यापारी शैतान लाल यांची सोमवारी जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. त्यानंतर, स्थानिक नागरिकांनी आंदोलन करत पोलिसांवर आरोपींच्या अटकेसाठी दबाव टाकला.
शैतान लाल यांच्या जमिनीवर एक कापूस फॅक्टरी आणि पिठाच्या चक्कीचं उद्घाटन झालं होतं. जेथे काही लोकांना गोळी मारुन त्यांची हत्या केली. सुरुवातीला आम्हाला वाटले की, समाजाचे अध्यात्मिक गुरू सेन साधराम यांच्या स्वागतासाठी हवेत गोळीबार करण्यात आला असेल, अशी माहिती घटनास्थळवर समक्ष असलेल्या लाल यांचे मित्र अनिल कुमार यांनी दिली.
शैतान लाल यांनी लावले धमकीचे आरोप
एका व्हायरल व्हिडिओत काही महिन्यांपूर्वी शैताना लाल यांना कोणीतरी धमकी दिल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, ते मला मारण्याची, माझे डोळे फोडण्याची आणि माझे हात-पाय कापण्याची धमकी देत आहेत, ते मला पाकिस्तानमधून जाण्यास सांगत आहेत. मी या देशाचा आहे, मी मरणे पसंत करेल, पण आत्मसमर्पण करणार नाही. रस्त्याच्या कडेची जमिन माझी आहे, मी ती सोडणार नाही, असे शैतान लाल सांगत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, यावेळी शैतान लाल यांनी पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश आणि इतर अधिकाऱ्यांकडे न्याय मिळण्याची विनंती केली होती.
व्यवसायिकाच्या हत्येचा विरोध
हिंदू व्यवसायिकाची हत्या केल्याच्या विरोधात मंगळवारी मोठ्या संख्येनं आंदोलकांनी राष्ट्रीय राजमार्गावर रास्ता रोको केला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी शैतान लाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सरगना बचाल दाहर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. यापूर्वी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी डहारकी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले होते. दरम्यान, 2 एक जमिनीवरुन हा वाद झाला होता.
अल्पसंख्यांक समाजावर हल्ले
शैतान लाल यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत असल्याची टीका होत आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सिंध प्रांतातील बाजार समितीमध्ये अज्ञात व्यक्तींकडून एका 44 वर्षीय सुनिल कुमार या हिंदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही हल्ल्यामुळे अल्पसंख्याक विशेषतत: हिंदू, अहमदिया आणि ईसाइ समुदायातील नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत.