कराची : पाकिस्तान स्थित ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी कैसर फारुखची दिवसाढवळ्या हत्या झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया ‘एक्स’वर हत्येचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातील सीसीटीव्ही फुटेजनुसार ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंधित असलेल्या फारूखची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कोणत्या वेळेचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सदर फुटेज कराचीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. कैसर फारुख हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. फुटेजमध्ये कैसर फारुख काही लोकांसोबत चालत असताना अचानक गोळीबाराचा आवाज येतो. गोळ्यांचा आवाज येताच फारुखबरोबर जात असलेले लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागतात आणि लपण्यासाठी जागा शोधतात.
एक व्यक्ती जमिनीवर पडताना. ती व्यक्ती दहशतवादी कैसर फारुख असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, कराचीमध्ये कैसर फारूख नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र, तो भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे की अन्य कोणी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, संरक्षणतज्ज्ञ तो दहशतवादी असल्याचा दावा
करत आहेत. (वृत्तसंस्था)
...म्हणे, आत्मघाती स्फोटांमागे भारत
बलुचिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटानंतर पाकिस्तानने आपल्या जुन्या खोडीनुसार त्यासाठी भारताला दोष देण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री सरफराज बुगती यांनी बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी झालेल्या आत्मघाती स्फोटासाठी भारताच्या ‘संशोधन आणि विश्लेषण विंग’ (रॉ) या गुप्तचर संस्थेला जबाबदार धरले आहे.
पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या स्फोटात ६० जण ठार झाले होते. बुगती यांच्या आरोपावर भारताने अद्याप वक्तव्य केलेले नाही.
मस्तुंगमधील मदिना मशिदीजवळ एका धार्मिक मिरवणुकीला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात एका मशिदीजवळ एका आत्मघाती हल्ला करणाऱ्याने पोलिसांच्या वाहनाजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला.