माले : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी उपाध्यक्ष अहमद अदीब यांना शनिवारी अटक करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री उमर नासीर यांनी दिली. यामीन यांच्या नावेत सप्टेंबरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. सुदैवाने ते यातून बचावले होते. अटकेनंतर अदीब यांना धुनीधु तुरुंगात ठेवण्यात आले आहे, असे नासीर यांनी टष्ट्वीटरवरून सांगितले. अदीब यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. अदीब सिंगापूरहून मायदेशी परतल्यानंतर पोलिसांनी विमानतळावरच त्यांना अटक केली. यामीन यांच्या नावेत (स्पीडबोट) २८ सप्टेंबर रोजी बॉम्बस्फोट झाला होता. त्यासंदर्भातील चौकशीसाठी अदीब यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला. या स्फोटाच्या चौैकशीसंदर्भात न्यायालयाने अदीब यांच्याविरुद्ध वॉरंट काढले होते. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आले, असे मालदीवच्या पोलिसांनी टष्ट्वीटरवर सांगितले. अदीब यांचे पूर्वपदस्थ मोहंमद जमील यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांची हकालपट्टी केल्यानंतर यामीन यांनी तीन महिन्यांपूर्वी अदीब यांची उपराष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती केली होती. यामीन हज यात्रेवरून परतून राजधानी मालेकडे जात असताना त्यांच्या नावेत स्फोट झाला होता. या स्फोटातून यामीन बचावले. मात्र, त्यांच्या पत्नी आणि इतर दोघांना किरकोळ इजा झाली होती. अदीब यांच्या नाट्यमय अटकेच्या काही तास आधी राष्ट्राध्यक्षांनी पोलीसप्रमुख वहीद यांची हकालपट्टी केली होती. यामीन यांनी निष्ठा संशयास्पद असलेल्यांच्या हकालपट्टीचा धडाका लावला आहे. दहा दिवसांपूर्वी त्यांनी संरक्षणमंत्री मुसा अली जलील यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता, तर गुरुवारी सरकारचे मुख्य प्रवक्ते मोहंमद शरीफ यांची हकालपट्टी केली होती. २८ सप्टेंबरच्या स्फोटानंतर शरीफ यांनी श्रीलंकेत धाव घेतली होती. हा स्फोट तांत्रिक मुद्दा असू शकतो, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, नंतर प्रशासनाने हा हत्येचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)
राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट; उपराष्ट्राध्यक्षांना अटक
By admin | Published: October 25, 2015 3:59 AM