ऑनलाइन लोकमत
लिऑन, दि. 28 - सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लग्नाच्या वयाचे झालेले तरुण-तरुणी सुयोग्य जोडीदाराचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिया, डेटींग अॅप्सचा आधार घेतात. पण अशा माध्यमांचा वापर करताना समोरच्या माणसाची 100 टक्के हमी मिळत नसते. डेटींग अॅप्सचा वापरणारे सर्व प्रामाणिक नसतात. पैशाची फसवणूक, शरीरसुख मिळवणे असे सुद्धा काही जणांचे हेतू असतात.
मध्य मेक्सिकोच्या लिऑन शहरात असेच एक प्रकरण समोर आले आहे. टींडर डेटींग अॅपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर इमान्युल देलानी वालदेझ (26) या तरुणाने फ्रान्सिया रुथ इबारा या (26) वर्षीय तरुणीकडे सेक्सची मागणी केली. पण फ्रान्सियाने इमान्युलची मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या इमान्युलने फ्रान्सिया रुथची अत्यंत अत्यंत क्रूरपद्धतीने हत्या केली.
त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून त्याने फ्रान्सियाच्या मृतदेहाला अॅसिडने आंघोळ घातली. फ्रान्सियाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर तपासामध्ये इमान्युलचे नाव समोर आले. इमान्युलची चौकशी करुन तो रहात असलेल्या अपार्टमेंन्टमध्ये शोध घेतला. त्यावेळी त्याच्या घरात मानवी हाडांचे अवशेष सापडले. फ्रान्सियाचे कपडेही त्याच्याच घरात सापडले. डीएनएच चाचणीतून ते अवशेष फ्रान्सियाचे असल्याचे स्पष्ट झाले. टिंडर अॅपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर दोघेही काही महिने भेटत होते.