काबूल : तालिबानविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि लढणाऱ्या एका दहा वर्षांच्या शाळकरी मुलाला तालिबानने गोळ्या घालून ठार मारले. तिरीन कोट शहरात ही खळबळजनक घटना घडली. तालिबानशी लढणारा हा मुलगा अलीकडच्या काळात हीरो ठरला होता. वासिल अहमद असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलाने मागील वर्षी तालिबानच्या विरुद्ध भूमिका घेतली होती. अफगाणिस्तानात मुलांचे भविष्य किती अंधकारमय आणि असुरक्षित आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अफगाणिस्तानातील मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष रईफउल्लाह बैदर म्हणाले की, राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सैन्यात मुलांचा वापर करू नये असे सक्त आदेश दिल्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. कुंदुज आणि अन्य क्षेत्रात सैन्यात मुलांचा सर्रास वापर होत आहे. दरम्यान, वासिलपासून त्यांना काय धोका होता ज्यांनी हे कृत्य केले? असा सवालही बैदर यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)वासिलचे काका मुल्ला अब्दुल समद तालिबानचे एक कमांडर होते. चार वर्षांपूर्वी ते सरकारच्या बाजूने उभे राहिले. वासिलच्या वडिलांसह अन्य सैन्याला सोबत घेऊन समद हे तालिबानच्या विरुद्ध उभे राहिले. मागील वर्षी एका संघर्षात समदच्या सैन्याचे १८ जण मारले गेले. त्यात वासिलच्या वडिलांचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वी तालिबानने केलेल्या घेराबंदीत समद यांच्या सैन्याचे १० जण जखमी झाले. याचवेळी वासिलने सुरक्षेची जबाबदारी सांभाळली होती. वासिलने यावेळी एका छतावरून रॉकेट हल्लाही केला होता. मोठ्या संघर्षानंतर ही घेराबंदी हटविण्यात यश आले होते. त्यानंतर समद आणि वासिलसह त्यांच्या सैन्याचे मोठे स्वागत झाले होते.
चिमुरड्या अफगाण नायकाची हत्या
By admin | Published: February 04, 2016 2:58 AM