ठळक मुद्देमॅन्सनचा चार दशकांपुर्वी स्वतःचा मोठा चाहतावर्ग होता. घरदार सोडून त्याच्यामागे जाणारे, त्याचं नेतृत्त्व मानणारे हिप्पी मोठ्या संख्येने अमेरिकेमध्ये होते. त्याच्या चाहत्यावर्गाला "मॅन्सन फॅमिली किंवा द फॅमिली"असंच म्हटलं जायचं.
लॉस एजंल्स- 1960 च्या दशकामध्ये अमेरिका आणि संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या चार्ल्स मॅन्सनचा अमेरिकेत तुरुंगात मृत्यू झाला आहे. हिप्पींच्या या नायकाने 1969 साली गरोदर असणारी अभिनेत्री शेरॉन टेट आणि इतर सहा व्यक्तींचा खून केला होता. जवळजवळ 50 वर्षे तुरुंगात काढल्यावर मॅन्सनला वयाच्या 83 व्या वर्षी मृत्यू आला.
मॅन्सनचा चार दशकांपुर्वी स्वतःचा मोठा चाहतावर्ग होता. घरदार सोडून त्याच्यामागे जाणारे, त्याचं नेतृत्त्व मानणारे हिप्पी मोठ्या संख्येने अमेरिकेमध्ये होते. या चाहत्यावर्गाला मॅन्सन फॅमिली असंच म्हटलं जायचं. त्याने आणि त्याच्या पाठिराख्यांनी 9 ऑगस्ट 1969 रोजी अभिनेत्री शेरॉन टेटची हत्या केली होती. यावेळी शेरॉन साडेआठ महिन्यांची गरोदर होती. तिच्याबरोबर अबिगेल फोगर, प्रसिद्ध केशभूषातज्ज्ञ जाय सेब्रिंग, पोलिश दिग्दर्शक वोईट्यक फ्रायकोवस्की, स्टीव्हन यांची हत्या केली होती. टेटचा नवरा दिग्दर्शक रोमन पोलन्स्की घरामध्ये नसल्यामुळे तो या हत्याकांडातून वाचला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी लेनो आणि त्याची पत्नी रोझमेरी लाबियांन्का यांची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर मृतांच्या रक्तानेच ते तेथे अपशब्द लिहून जात असत.
मॅन्सने या लोकांच्या हत्या का करायला सांगितल्या याबाबत कधीच स्पष्ट व खरी माहिती मिळालेली नाही. कोर्टामध्येही त्याने स्वतःला निर्दोषच म्हणवत मी कोणाचीही हत्या केली नाही, मी कोणालाही मारण्यास सांगितलेले नाही असा युक्तीवाद केला होता. त्याच्या खटल्याच्यावेळी संपुर्ण न्यायालय एखाद्या नाट्यगृहासारखे झाल्याचे सांगण्यात येते. त्याला शिक्षा झाली तर आत्मदहन करु असा इशाराही त्याच्या काही पाठिराख्यांनी दिला होता. 12 नोव्हेंबर 1934 साली जन्मलेल्या मॅन्सनच्या बालपणात त्याच्या गुन्ह्यांची बिजे दडलेली दिसून येतात. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची विशीही उलटलेली नव्हती. तो पाच वर्षांचा असतानाच त्याच्या आईला सशस्त्र दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यात कारागृहात जावे लागले होते. आठ वर्षांचा होईपर्यंत त्याला सुधारगृहात राहावे लागले होते. मॅन्सनने केलेल्या हत्यांवरुन प्रेरणा घेऊन अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या कथा लिहिण्यात आल्या. त्याचा फोटो लोकांनी टी शर्टवर छापूनही घेतला होता. त्याने कपाळावर इंग्रजी एक्स अशी खूण करुन घेतल्यावर त्याच्या चाहत्यांनीही आपल्या कपाळावर एक्स खूण कोरुन घेतली.