परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द करण्यास सुप्रीम कोर्टात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 01:06 PM2020-02-05T13:06:27+5:302020-02-05T13:14:39+5:30
फाशी रद्द करण्याविरोधात वरिष्ठ वकील हामिद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
लाहोर : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा लाहोरच्या उच्च न्यायालयाने रद्द केली होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या या निकालास मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुशर्रफ यांची फाशी रद्द करण्याच्या निकालास आव्हान देण्यात आले असल्याने येत्या काळात परवेज मुशर्रफ यांच्यासमोरील अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता. तर पाकिस्तानमधील विशेष कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
याप्रकरणी मुशर्रफ यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱ्या विशेष न्यायालयालाच असंवैधानिक म्हटले होते. तर, परवेश मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली होती. त्यामुळे, मुशर्रफ यांना मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र, फाशी रद्द करण्याविरोधात वरिष्ठ वकील हामिद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लाहोर उच्च न्यायालयाचा फैसला रद्द करण्यात यावा. कारण अशा स्वरूपाचा निकाल हा घटनेतील कलम ६ चे उल्लंघन करणारा आहे. पाकिस्तानच्या इतिहासात विशेष न्यायालये नेहमीच महत्त्वपूर्ण ठरली आहेत. त्यामुळे विशेष न्यायालयाचा आदर करणे अत्यावश्यक आहे, असा युक्तिवाद खान यांनी केला आहे.