इस्लामाबाद - पाकिस्तानातील विशेष न्यायाधिकरणाने माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना अटक करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मुशर्रफ यांच्यावर २००७मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लादल्याबाबत देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता.पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याह्या आफ्रिदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी गृह मंत्रालयाने मुशर्रफ यांच्या देशातील संपत्तीचा सविस्तर अहवाल न्यायाधिकरणाला सादर केला. सरकारी वकील अक्रम शेख यांनी या वेळी मुशर्रफ यांना अटक करून न्यायाधिकरणासमोर उभे करण्याची मागणी केली.मुशर्रफ यांचे वकील अख्तर शाह यांनी न्यायाधिकरणाला संपत्ती २१ मार्चपर्यंत जप्त केली जाऊ नये, अशी विनंती केली होती; परंतु न्या. आफ्रिदी यांनी ती फेटाळून लावली. मुशर्रफ यांना दुबईतून अटक करण्यासाठी यूएईसोबत पाकिस्तानने परस्पर कायदेशीर सहकार्य करार करण्याची सूचनाही त्यांनी केली. या वेळी न्यायाधिकरणाने १० महिने उलटून गेल्यानंतरही मुशर्रफ यांच्या परदेशातील संपत्तीचा तपशील सादर न केल्याने संताप व्यक्त केला. ही कारवाई करण्यात नेमक्या काय अडचणी आहेत, अटकेसंदर्भात अद्याप इंटरपोलशी संपर्क का करण्यात आला नाही, असा सवालही न्यायाधिकरणाने केला. (वृत्तसंस्था)मृत्युदंड किंवा जन्मठेप?परवेझ मुशर्रफ मार्च २०१६मध्ये पाकिस्तान सोडून दुबईला गेले. आणीबाणी लादल्याबद्दल न्यायाधिकरणाने मे २०१६मध्येच मुशर्रफ यांना अपराधी म्हणून घोषित केले होते. आणीबाणीच्या काळात पाकच्या अनेक वरिष्ठ न्यायाधीशांना नजरकैद केले होते आणि १००हून अधिक न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आले होते. देशद्रोहाच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या मुशर्रफ यांना मृत्युदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. मुशर्रफ १९९९ ते २००८ या काळात सत्तेत होते. मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह अनेक खटले सुरू आहेत.
परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश , देशद्रोहाचा खटला; संपत्तीवरही येणार टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:43 AM