लाहोर - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानमधील विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. लाहोरच्या उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱ्या विशेष न्यायालयालाच असंवैधानिक म्हटले आहे. त्यामुळे, परवेश मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, मुशर्रफ यांना मोठा दिलासा देणारा हा न्यायालयाचा निर्णय आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना 2007 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ होती. परवेझ मुशर्रफ 1999 ते 2008 या काळात सत्तेत होते.
देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी 2007 ला शंभरहून अधिक न्यायाधीशांना पदावरून हटवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याशिवाय, परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह अनेक खटले सुरू आहेत.