इंडोनेशियात सर्वोच्च मुस्लीम क्लेरिकल काऊन्सिलनं मशिदीवरील लाऊडस्पीकर वापराबाबत आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून देशात अनेक लोकांनी या लाऊडस्पीकरच्या तक्रारी केल्या आहेत. इंडोनेशिया जगातील सर्वात मोठा मुस्लीम बहुल देश आहे. या देशात ६ लाख २५ हजार मस्जिदी आहेत. तर देशातील २७ कोटी लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकसंख्या ही मुस्लीम समुदायाची आहे.
देशातील धार्मिक प्रकरणातील मंत्रालयाने १९७८ मध्ये एक आदेश जारी केला होता त्यात मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरच्या उपयोगाबाबत दिशानिर्देश देण्यात आले होते. लोकांच्या वारंवार तक्रारी पाहता या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियाई उलेमा काऊन्सिलनं सांगितले की, वर्तमान सामाजिक बदल आणि वाढता त्रास कमी करण्यासाठी या दिशानिर्देशावर पुन्हा फेरविचार करायला हवा. इंडोनेशियात बहुतांश मशिदीवर लाऊडस्पीकरचा वापर होतो. त्यातील अनेक लाऊडस्पीकर असे आहेत ज्यामुळे लोकांनी ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी केल्या आहेत.
लाऊडस्पीकर बनली मोठी समस्या
या प्रकरणात इंडोनेशियाई उपराष्ट्रपती मारुफ अमीन यांचे प्रवक्ते मासडुकी बैदलावी यांनी सांगितले की, धार्मिक विद्वानांनी मस्जिदीवरील लाऊडस्पीकर्सचा अनियंत्रित उपयोगाबाबत चिंता व्यक्त होत आहे. ही एक मोठी समस्या असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. विशेषत: शहरी भागात याचा त्रास जास्त जाणवतो. लाऊडस्पीकर्सबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. परंतु त्याचे योग्य तसं पालन होत नाही. इंडोनेशियाचे धार्मिक प्रकरणाचे मंत्री याकूत चोलिल कुमास यांनी या आदेशाचे स्वागत केले आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकर्सबाबत योग्य आणि काळजीपूर्वक वापर आवश्यक झाला आहे.
या प्रकरणात मुस्लीम काऊन्सिल फतवा कमिशन सेक्रेटरी मिफ्ताहुल म्हणाले की, आम्हाला लाऊडस्पीकर्सचा योग्य वापर करायला हवा. आम्ही मनमानी करू शकत नाही. आपले विचार भलेही योग्य असतील तरी त्याचा दुसरा त्रास होतोय त्याचा विचार करायला हवा. २०१७-२२ च्या परिषद मुख्य कार्यक्रमात मशिदीवरील लाऊडस्पीकर्सच्या आवाजावर नियंत्रण आणणे हे उद्दिष्ट आहे. मागील काही वर्षापासून इंडोनेशियात लाऊडस्पीकर्सच्या वापराबाबत वाद सुरु आहेत. पहाटे ३-४ वाजता लाऊडस्पीकर्सच्या कर्कश आवाजामुळे अनेकांवर मानसिक तणाव येत असल्याचं म्हटलं आहे.