फ्रॅकफोर्ट - आपल्याच मुलाची हत्या करणा-या आरोपीची गळाभेट घेऊन त्याला माफ करा असं सांगितल्यावर अनेकजण हा मुर्खपणा असल्याचं सांगत वेड्यात काढतील. असं करायचं राहूदे पण विचारही साधा कोणी करणार नाही, पण असं झालं आहे. एका पित्याने आपल्या मुलाच्या मारेक-याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मिठी मारुन माफ केलं. 24 वर्षीय ट्रे रेलफोर्ड याला न्यायालयाने पिझ्झा डिलिव्हरी बॉय सलाहुद्दीन जितमौद याची हत्या केल्याच्या आरोपाखाली 31 वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयात सुनावणी सुरु असताना सलाहुद्दीन जितमौदचे वडिल डॉ अब्दुल मुनीम सोम्बत जितमौद यांनी रेलफोर्डला मिठी मारुन त्याला माफ केलं.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, 22 वर्षीय सलाहुद्दीन याची 15 एप्रिल 2015 रोजी हत्या करण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स ऑप लेक्सिंग्टन येथे झालेल्या लुटमारीनंतर सलाहुद्दीनची हत्या करण्यात आली होती. सलाहुद्दीन त्यावेळी आपलं पिझ्झा डिलिव्हरीचं काम करत होता. जवळपास दोन वर्ष सुरु असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी रेलफोर्डला शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयात उपस्थित डॉ जितमौद यांनी आपल्या मुलाची आठवण करत त्याच्या मारेक-याला माफ केलं. 'एखाद्याला माफ करणं इस्लाममधील सर्वात मोठं दान आहे', अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आपला मुलगा खूप शांत आणि उदार मनाचा होता. त्याला प्रोडक्शन आणि लिखाणाची आवड होती असं यावेळी डॉ जितमौद यांनी सांगितलं. आपल्या मुलाची आठवण काढताना त्यांनी सांगितलं की, 'ज्या रात्री त्याची हत्या झाली तेव्हा त्याला पिझ्झा डिलिव्हरी करायची होती. त्यानंतर त्याचं काम संपणार होतं'. न्यायालयात अत्यंत भावूक झालेल्या डॉ जितमौद यांनी सांगितलं की, मी रेलफोर्डला या गुन्ह्यासाठी आरोपी मानत नाही. 'मला त्या राक्षसाचा द्वेष आहे ज्याने तुझ्याकडून हे करवून घेतले', असं डॉ जितमौद बोलले.
न्यायालयात सुनावणी सुरु असताना न्यायाधीशांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. यामुळे त्यांनी ब्रेकही घेतला होता. दरम्यान डॉ जितमौद यांच्या उदार मनाची चर्चा सुरु असून, जगभरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. आरोपी रेलफोर्डच्या आईनेही यावेळी आपला मुलगा कशाप्रकारे अंमली पदार्थांच्या नादात अडकला आणि चुकीच्या मार्गाला गेलं याबद्दल सांगितलं. त्यांनी यावेळी डॉ जितमौद यांचे आभारही मानले. 'मी तुमच्या मुलाच्या मृत्यूमुळे खूप दुखी आहे. मी याची पुर्ण जबाबदारी घेते. तुम्ही माझ्या मुलाला माफ केलंत हे पाहून मला आश्चर्य वाटतंय', अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी आरोपी रेलफोर्डने आपल्या गुन्ह्यासाठी माफी मागताना म्हटलं की, 'त्यादिवशी जे काही झालं त्यासाठी मी माफी मागतो. मी तुमच्या दुखाची कल्पना करु शकतो. मी कहीच करु शकत नाही. तुम्ही मला माफ केलंत यासाठी तुमचे आभार मानतो'. हत्येच्या आरोपाखाली रेलफोर्डसोबत अन्य दोघांनाही अटक करण्यात आली होती. पण न्यायालयाने फक्त रेलफोर्डला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.