इस्लामाबाद: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्रांनीच खडे बोल सुनावले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोला, अशा सूचना मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना केल्या आहेत. दोन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव चर्चेतून सोडवा, असा सल्लादेखील मुस्लिम राष्ट्रांनी खान यांना दिला. अमेरिका, चीननंतर आता मुस्लिम राष्टांनीही पाकिस्तानच्या पाठिशी न राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींवर टीका केली. यावरुन मुस्लिम देशांनी खान यांचे कान उपटले आहेत. सौदी अरेबियाचे उप परराष्ट्रमंत्री अदेल अल-जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन अल-नह्यान ३ सप्टेंबरला इस्लामाबादमध्ये होते. त्यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या देशांच्या प्रमुखांच्या वतीनं देण्यात आलेला संदेश इम्रान खान यांच्यापर्यंत पोहोचवला. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी, लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा उपस्थित होते. अतिशय गुप्तपणे झालेल्या या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारीदेखील हजर होते. भारतासोबत झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चा करा. राजदूतांच्या मदतीनं हा प्रश्न सोडवा, असा सल्ला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून इम्रान खान यांना देण्यात आला. आम्ही भारताला काश्मीरमधील काही निर्बंध हटवण्यास सांगू, असं आश्वासन सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलं. आम्ही यासंदर्भात भारताशी बोलू. मात्र त्याआधी इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका थांबवावी, तोंडाला आवर घालावा, अशा शब्दांमध्ये दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावलं. काश्मीरवरुन खान यांनी अनेकदा मोदींवर टीका केली असून थेट युद्धाची धमकीदेखील दिली आहे.
नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:07 PM