मिनेसोटा: स्टारबक्सनं कॉफीच्या कपवर आयसिस लिहून दिल्याचा आरोप एका मुस्लिम तरुणीनं केला आहे. अमेरिकेतल्या मिनेसोटामधील स्टारबक्समध्ये हा प्रकार घडला. स्टारबक्समधील कर्मचाऱ्यानं कपवर आपलं नाव लिहिण्याऐवजी आयसिस लिहिल्याचा आरोप १९ वर्षीय तरुणीनं केला आहे. स्टारबक्सच्या कपवरील आयसिस हा शब्द पाहून भावना दुखावल्याचं आएशानं सांगितलं. आयसिस ही दहशतवादी संघटना असून ती इराक आणि सीरियामध्ये सक्रिय आहे. कपवर आयसिस लिहिण्यात आल्यानं आएशानं स्टारबक्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिनेसोटाच्या मानवाधिकार विभागानं हा गुन्हा नोंदवून घेतला आहे. भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप आएशानं स्टारबक्सवर केला आहे. स्टारबक्सच्या कपवरील अक्षरं पाहून मला धक्काच बसला, असं आएशानं सांगितलं. तो शब्द वाचून मला अतिशय अपमानित झाल्यासारखं वाटलं, अशा शब्दांमध्ये आएशानं तिला झालेला त्रास बोलून दाखवला. 'त्या शब्दामुळे संपूर्ण जगात मुस्लिमांची प्रतिमा मलीन झाली आहे. आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कृती स्वीकारार्ह नाही. मी ते सहन करू शकत नाही,' असं आएशानं म्हटलं.ही घटना १ जुलैला सेंट पॉल मिडवे येथील स्टारबक्समध्ये घडली. सध्याची परिस्थिती पाहता मी त्यावेळी फेस मास्क घातला होता, अशी माहिती आएशानं दिली. 'आएशा हे नाव अतिशय कॉमन आहे. त्यात चुकण्यासारखं काही नाही. त्यातही मी नाव काऊंटरवर अनेकदा स्पष्टपणे सांगितलं होतं. तरीही त्यांनी कपवर आयसिस कसं लिहिलं?, असा प्रश्न मला पडला', अशा शब्दांत आएशानं झालेला संपूर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी स्टारबक्समधील कर्मचारी महिलेनं स्वत:ची बाजू स्पष्ट केली. मी नाव नीट न ऐकल्यानं हा प्रकार घडला. त्यानंतर सुपरवायझरसोबत बोलून विषय मिटला होता. तिला (आएशाला) २५ डॉलरचं गिफ्ट कूपनदेखील देण्यात आलं होतं, असं स्टारबक्समधील कर्मचारी महिलेनं सांगितलं.
स्टारबक्सनं मुस्लिम तरुणीच्या कपवर नावाऐवजी 'आयसिस' लिहिलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:36 PM