इस्लामिक देश असलेल्या इराणमध्ये हिजाबला जबरदस्त विरोध हत असून, तेथील महिला हिजाबच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. एवढेच नाही, तर या महिला सार्वजनिक ठिकाणी हिजाब उतरवून व्हिडिओदेखील तयार करत आहेत. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या महिला हिजाब उतरवल्याचे व्हिडिओ पोस्ट करत इस्लामिक रिपब्लिकमधील हिजाब संदर्भातील नियमांचा निषेध करत आहेत.
‘हिजाब तथा शुद्धता दिवस’ चा विरोध - इराणच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपले केस झाकणे बंधनकारक आहे. येथे हिजाबवरून सातत्याने निदर्शने होत असतात. मात्र मंगळवारी देशभरात मोठ्या संख्येने इराणी महिलांनी हिजाबविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. खरे तर, इराणच्या अधिकाऱ्यांनी 12 जुलै (मंगळवार) हा दिवस 'हिजाब तथा शुद्धता दिवस' म्हणून घोषित केला होता. याच्याच निषेधार्थ महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
हिजाब उतरवून रस्त्यावर फेकत आहेत महिला - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये केवळ महिलाच नाही, तर पुरुषही इराणच्या कायद्याला विरोधात करत आहेत. काही व्हिडिओंमध्ये महिला आपला स्कार्फ आणि शॉल रस्त्यावर फेकताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर सार्वजनिक वाहतूक आणि दुकानांमध्येही महिला हिजाबशिवाय दिसत आहेत. त्या आपले केस मोकळे सोडून सार्वजनिक ठिकानी फिरतानाही दिसत आहेत.
हिजाबसाठी लष्कर मैदानात - हिजाब अनिवार्य करण्यासाठी इराण सरकारने देशातील सुरक्षा दलांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यानुसार, महिलांना हिजाब अनिवार्य करण्यासाठी लष्कर जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, असे असतानाही महिलांचे आंदोलन अधिकाधीक तीव्र होताना दिसत आहे.