ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ४ - देशभरातील मुस्लीमांमध्ये खरं सांगायचं तर भीतीचं वातावरण असल्याचे उद्गार बराक ओबामा यांनी काढले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील इस्लामविरोधी सूर अक्षम्य असल्याचे मत अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे अमेरिकेने इस्लामची गळचेपी करू नये. मेरिलँडमधल्या बाल्टिमोरमधल्या मशिदीमधून मुस्लीम समुदायासमोर केलेल्या ऐतिहासिक भाषणात ओबामांनी एखाद्या धर्माविरोधात द्वेषनिर्मिती होत असताना अमेरिकी लोकांनी बघ्याची भूमिका घेऊ नये असे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी मुस्लीमांसारखे दिसणा-या शीखांवरील हल्ल्यांचाही उल्लेख केला.
खरंतर आत्ता देशभरातील मुस्लीमांमध्ये चिंतेचे आणि खरं सांगायचं तर भीतीचं वातावरण असल्याचे ओबामा म्हणाले.
अमेरिकेत धर्मस्वातंत्र्य आहे, त्यामुळे कुठल्याही धर्माविरोधात कारवाया होत असतील तर त्याविरोधात आवाज उठवायला हवा अशी अपेक्षा त्यांनी केली. काही लोकांच्या हिंसात्मक कारवायांमुळे संपूर्ण समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे ओबामा म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता ओबामा म्हणाले की, मुस्लीमांना या देशात जागा नाही असा अक्षम्य पवित्रा राजकीय व्यक्ति घेत आहेत, ज्यामुळे मुस्लीमांना दिल्या जाणा-या धमक्यांमध्ये व त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
मुस्लीमांनी कट्टरता आणि दहशतवाद यांना धिक्कारायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.