वॉशिंग्टन : कॅलिफोर्निया हत्याकांडानंतर मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशास पूर्णपणे बंदी घालावी, असे आवाहन अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी केलेले आतापर्यंतचे हे सर्वात वादग्रस्त विधान ठरले असून, विरोधकांसह सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. ‘आमच्या देशाच्या प्रतिनिधींनी नेमके काय सुरू आहे याचा शोध घेईपर्यंत तरी मुस्लिमांना देशात प्रवेशास पूर्णपणे बंदी घालावी,’ असे ट्रम्प यांच्या प्रचार कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक आधारावर परीक्षा घेण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हे विधान केले.ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनात आयोजित एका सभेला मार्गदर्शन करताना आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. ‘आमच्याजवळ दुसरा पर्यायच नाही. कठोर पावले न उचलल्यास ११ सप्टेंबर २००१ हल्ल्यांसारखे हल्ले होतील, असा इशाराही त्यांनी दिला. (वृत्तसंस्था)कौन्सिल आॅन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सनेही (सीएआयआर) ट्रम्प यांच्या वक्तव्यावर टीका केली. कोणताही विचार न करता दिले गेलेले हे बिगर अमेरिकन वक्तव्य आहे. रिपब्लिकन नेते जेब बुश म्हणाले की, ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याची प्रतिक्रिया दिली. राष्ट्राध्यक्षपद निवडणुुकितील डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ट्रम्प यांचे हे विधान निंदनीय, पक्षपाती आणि फुटीरवादी असल्याचे त्या म्हणाल्या. अशा गोष्टी आम्हाला अधिक असुरक्षित बनवतात हे तुम्हाला समजत नाही, असेही त्यांनी ट्रम्प यांना सुनावले.
मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश नको
By admin | Published: December 08, 2015 11:31 PM