मिलवॉकी : ‘माझा मृत्यू निश्चित करण्यात आला होता’, असा दावा करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हानियातील निवडणूक प्रचार सभेत त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर या घटनेला विचित्र अनुभव म्हटले आहे.
घटनेनंतर पहिल्या मुलाखतीत ७८ वर्षीय ट्रम्प यांनी ‘भाग्य किंवा देवाच्या कृपेने आपण बचावलो’, असे माध्यमांना सांगितले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मिलवॉकीला जात असताना, ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘माझ्याबद्दल असे मानले जात होते, मी येथे राहणार नाही, माझा मृत्यू निश्चित करण्यात आला होता. सर्वांत अविश्वसनीय गोष्ट म्हणजे मी फक्त माझे डोकेच फिरवले नाही, तर ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वळवले. ती गोळी कानाला चाटून गेली, अन्यथा माझा सहज मृत्यू झाला असता’, असेही ते म्हणाले.
‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी उजव्या कानावर पांढरी पट्टी घातली होती, मात्र त्यांच्या सहायकांनी कोणतेही छायाचित्र काढू दिले नाही.
‘तो’ बंदूकधारी एकटाच होता
पेनसिल्व्हानिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या बंदूकधारी व्यक्तीने एकट्यानेच कृत्य केल्याचे दिसते.
घरगुती दहशतवादी कृत्य म्हणूनच त्याची चौकशी करत आहोत, असे अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयतर्फे सांगण्यात आले.
थॉमस मॅथ्यू क्रुक्स (वय २०) असे बंदूकधारी व्यक्तीचे नाव आहे. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही मानसिक आरोग्य समस्या नव्हती किंवा धमकी देणारी पोस्ट, इतर हेतू समोर आलेले नाहीत.
बायडेन यांचे आवाहन...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
राजकारणात भडकाऊ वक्तव्यांपासून दूर राहा. आपल्यात मतभेद असू शकतात, परंतु आपण शत्रू नाही, तर मित्र आहोत, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अमेरिकी नागरिक आहोत, असे ते म्हणाले.
संभाव्य गृहयुद्धापासून एक इंच दूर होतो...
ट्रम्प यांच्यावरील हल्ला पाहता आम्ही संभाव्य गृहयुद्धापासून केवळ एक इंच दूर होतो. ट्रम्प जर गंभीर जखमी झाले असते, तर आपण आतापर्यंत जेवढी हिंसा पाहिली, ती पुढील काही महिन्यांत घडणाऱ्या घटनांच्या तुलनेत काहीच नसती.
nयामुळे राग, निराशा, संताप, शत्रुत्वाची एक नवीन पातळी निर्माण झाली असती, जी आपण अनेक वर्षांपासून अमेरिकेत पाहिली नाही,’ असे मत मॅसॅच्युसेट्स येथील लोवेल विद्यापीठातील विद्वान अरी पर्लिगर यांनी व्यक्त केले आहे.