म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता (Myanmar Army) हस्तगत केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. म्यानमारमध्ये शनिवार हा रक्तरंजित दिवस ठरला आहे. लष्कराने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 144 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. बंडखोरीनंतर देशभरातील 44 शहरांत सर्वात मोठा रक्तपात करण्यात आला. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या या रक्तरंजित खेळाने जगाला चिंतेत टाकले आहे.
म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरले असून आंग सान सू यांना सोडण्याची मागणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सैन्याने आक्रमक रुप घेत आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि म्यानमारमधील यूएनच्या कार्यालयाने या हिंसाचाराविरोधात खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्यासदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिथे 2156 लोकांना अटक करण्यात आली आहे. ब्रिटिश सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडूनही म्यानमारच्या लष्कराने लोकांनी निवडून दिलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा जोरदार निषेध केला आहे.
म्यानमारमध्ये फेब्रुवारी 2021 ला सेनेकडून सत्तापालट करण्यात आल्यानंतर सतत विरोध प्रदर्शन केलं जात आहे. सेनेविरोधातील या प्रदर्शनांमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अशात विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत. रॉयटर्सनुसार, म्यानमारच्या महिला एक खासप्रकारचा स्कर्ट घालतात. ज्याला स्थानिक भाषेत सारोंग असं म्हणतात. म्यानमारमध्ये अशी मान्यता आहे की, जो पुरूष महिलेच्या या सारोंग खालून जातो त्याचं पौरूषत्व नष्ट होतं. हेच कारण आहे की, मिलिट्रीला रोखण्यासाठी महिला सारोंगचा वापर करत आहेत.