जिनीवा, दि. 22 - देश सोडून बांगलादेशात आश्रयास आलेल्या भुकेल्या, संकटग्रस्त रोहिंग्यांना म्यानमारने आपल्या देशात परत बोलवावे असे आवाहन हसीना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना केले. म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसक घटनांचा वाजेद यांनी निषेधही केला.
आमसभेत केलेल्या भाषणात शेख हसीना म्हणाल्या, "बांगलादेशने ८ लाख रोहिंग्यांना आश्रय दिला आहे त्यातील ४ लाख ३० हजार रोहिंग्या केवळ गेल्या चार आठवड्यांमध्ये म्यानमार सोडून आश्रयासाठी आले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या निरिक्षणाखाली म्यानमारच्या राखीन प्रांतामध्ये रोहिंग्यांसाठी सेफ झोन्स तयार करण्यात यावेत अशी मागणीही शेख हसीना यांनी या भाषणात केली. म्यानमारने रोहिंग्यांच्या परतीच्या वाटेत भूसुुंग पेरले आहेत , हे एकदम भयावह आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्यांना संरक्षण आणि आत्मसन्मानासह परत येता येईल अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. "
२५ आँगस्टपासून राखिन प्रांतात भडकलेल्या हिंसेमुळे रोहिंग्यांचे जथ्थेच्या जथ्थे बांगलादेशात येऊन थडकत आहेत. कित्येकांनी नेफ नदी लाकडी बोटीच्या साह्याने ओलांडून धोका पत्करत बांगलादेशात प्रवेश केला आहे, या प्रवासात बोट बुडून काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. आश्रित रोहिंग्यांपैकी निम्मे लोक छावणीत राहात असून तेथे अन्न-पाणी, संरक्षण, वीज किंवा स्वच्छतेच्या कोणत्याही सेवा नाहीत. तसेच या रोहिंग्यांमध्ये ६० टक्के मुलांचा समावेश आहे. युनिसेफने सीमा अोलांडून बांगलादेशात आलेल्या १४०० अनाथ रोहिंग्यांची नोंद केली आहे.
1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना त्या म्हणाल्या की, नुकतेच देशातील संसदेनं 1971च्या युद्धामध्ये मृत्यू पावलेल्यानां श्रद्धांजली वाहून 25 मार्च हा नरसंहार दिवस म्हणून घोषित केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 25 मार्च 1971 च्या रात्री पाकिस्तानच्या सैन्यांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. तेव्हापासून युद्धाला सुरुवात झाली. 16 डिसेंबरला हे युद्ध संपले. 9 महिने चाललेल्या या युद्धामध्ये 30 लाख लोकांचा बळी गेला. तर 20000 पेक्षा आधिक महिलांच लैगिंक शोषण करण्यात आले. 1971 च्या मुक्ती संग्रामात आम्ही नरसंहारचे भयानक रुप पाहिले. 25 मार्च 1971मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं सुरु केलेल्या जघन्य ऑपरेशन सर्चलाइटनं नरसंहारला सुरुवात केली.