यांगून : म्यानमारमधील तीन सशस्त्र गटांपैकी आराकान आर्मी या गटाच्या बंडखोरांनी भारतीय सीमेनजीक असलेले पलेटवा हे शहर ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. या शहरातील सर्व लष्करी तळ आम्ही ताब्यात घेतले आहेत, असेही एएने म्हटले आहे.
म्यानमारमधील चीन राज्यात पलेटवा हे शहर आहे. त्या देशातून भारत व बांगलादेशमध्ये येण्यासाठी जो मार्ग आहे, त्यातील महत्त्वाचे शहर दहशतवाद्यांच्या हाती लागणे ही भारतासाठीदेखील चिंतेची बाब आहे. एएने केलेल्या दाव्यावर म्यानमारच्या लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
म्यानमारमध्ये वांशिक सशस्त्र गट असून, त्यांचा लष्कराशी संघर्ष सुरू आहे. त्यातील एए हा तुलनेने नवा गट असून, तो अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने सत्ता बळकावली. त्यावेळी एए गटाने म्यानमारमधील राखीन या भागावर ६० टक्के नियंत्रण मिळविल्याचा दावा केला होता.
भारताने ४१६ सैनिकांना पाठविले होते परतसशस्त्र गटांशी सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांत म्यानमारचे चारशेहून अधिक सैनिक पलायन करून भारताच्या हद्दीत आले होते. त्यातील काही सैनिक जखमी होते. त्यांना आसाम रायफल्सने काही दिवस भारतीय हद्दीत आश्रय दिला. त्यातील जखमी सैनिकांवर उपचार केले. आता या म्यानमारच्या सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. मात्र सशस्त्र गटांनी आता भारताच्या सीमेनजिकचे म्यानमारमधील शहर, काही गावे ताब्यात घेण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे म्यानमारबरोबरच भारतालाही चिंता वाटू लागली आहे.