ढाका- गेले तीन महिने रोहिंग्यांचे स्थलांतर, राखिन प्रांतातील अशांतता यावर कोणताच तोडगा अद्याप निघालेला नाही. भारतात घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल, अशी भूमिका घेणा-या भारत सरकारने अद्याप या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. म्यानमारने आपल्या नागरिकांना ( म्हणजे रोहिंग्यांना) पुन्हा माघारी बोलवून त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे, असे स्पष्ट मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. बांगलादेशच्या भेटीवर असताना स्वराज यांनी हे मत व्यक्त केल्याचे ढाका ट्रीब्यून या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.
सुषमा स्वराज दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या बैठकीत स्वराज यांनी म्यानमारला आपले नागरिक माघारी घ्यावेच लागतील असे मत व्यक्त केल्याचे पंतप्रधान वाजेद यांचे प्रसिद्धी सचिव एहसानुल करिम यांनी सांगितले. या बैठकीतील चर्चेत सुषमा स्वराज म्हणाल्या " म्यानमारने आपले नागरिक माघारी बोलवावेत, .... हे बांगलादेशवर ( स्थलांतरितांचे) ओझे आहे. ते बांगलादेश कितीकाळ सहन करु शकेल ? यावर कायमस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे." तसेच स्वराज यांनी राखिन प्रांताच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. बांगलादेशाने मानवाधिकारांचा विचार करुन राखिन प्रांतातून परागंदा व्हाव्या लागलेल्या लोकांना आधार व आश्रय दिल्याबद्दल त्यांनी बांगलादेशचे कौतुकही केले.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेश याबाबत म्यानमारशी सतत चर्चा करत असल्याचे सांगून बांगला गृहमंत्री लवकरच म्यानमारभेटीवर जाणार असल्याचे सांगितले. सुषमा स्वराज यांनी या बैठकीच्या वेळेस १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामासंदर्भातील काही भेटवस्तू शेख हसिना स्वराज यांना सादर केल्या. यामध्ये पाकिस्तानने पत्करलेल्या शरणागतीची रंगित प्रत, मूळ रेफ्युजी रिलिफ पोस्टल स्टॅम्पची रंगित प्रत तसेच युद्धावेळी बांगलादेशात विमानातून टाकलेल्या पाकिटांची रंगित प्रत भेट म्हणून देण्यात आली. सुषमा स्वराज आणि शेख हसिना वाजेद यांच्याबरोबर या बैठकीत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एएच महमूद अली, बांगलादेशच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार डॉ. गौहर रिझवी, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त सय्यद मुअझ्झिम अली, भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त हर्षवर्धन शृंगला उपस्थित होते. ढाका ट्रीब्यूनच्या माहितीनुसार सुषमा स्वराज यांनी आपल्या वक्तव्यात, राखिन प्रांताच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करुन तेथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र संपूर्ण चर्चेमध्ये स्वराज यांनी "रोहिंग्या" शब्द वापरण्याएेवजी म्यानमारचे विस्थापित नागरिक अशाच शब्दांचा वापर केला.