यंगून : भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये २५ वर्षांनंतर लोकशाहीसमर्थक आँग सॅन सू की यांचा ‘नॅशनल डेमोक्रॅटिक लीग’(एनएलडी) हा पक्ष मोठ्या बहुमताकडे वाटचाल करीत असतानाच म्यानमारच्या लष्करप्रमुखांपाठोपाठ देशाच्या राष्ट्रपतींनीही सू की यांना पक्षाच्या विजयासाठी शुभेच्छा देत, शांततापूर्ण सत्तापरिवर्तनाची ग्वाही दिली आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये आँग सॅन सू की यांचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.म्यानमारमध्ये सुमारे ५० वर्षांपर्यंत लष्कराची सत्ता राहिली आहे. विद्यमान सत्ताधारी पक्षालाही लष्कराचे समर्थन आहे. या देशात लष्करी राजवट समाप्त झाल्यानंतर युनियन सॉलिडॅरिटीच्या हाती सत्ता आली. या पक्षात सर्व माजी लष्करी अधिकारी आणि सैनिक आहेत. अशास्थितीत एनएलडी पक्षाला अभूतपूर्व यश मिळूनही लष्कर त्यास कसा प्रतिसाद देते याबाबत साशंकता होती. कारण यापूर्वी १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत एनएलडीला विजय मिळूनसुद्धा लष्कराने सरकारवरील आपली पकड कायम ठेवली होती. मात्र पक्ष बहुमताकडे वाटचाल करीत असलेला पाहून बुधवारी सू की यांनी लष्करप्रमुख मिन आंग लियाँग व राष्ट्रपती थीन सीन यांना चर्चेचे आवाहन केले होते. तसेच शांततापूर्ण सत्तांतरणाची मागणीही केली होती. त्यानुसार मिन आंग लियाँग व थीन सीन यांनी निवडणूक आयोगाचे संपूर्ण निकाल आल्यानंतर चर्चेची तयारी दर्शवली आहे. बुधवारी लष्करप्रमुखांनी सू की यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रपतींनीही सू की यांचे अभिनंदन केले आहे. निवडणूक निकालांचा आम्ही आदर करतो. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असेल आणि सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
म्यानमारमध्ये शांततापूर्ण सत्ता परिवर्तनाचा संकल्प
By admin | Published: November 13, 2015 12:12 AM