आफ्रिकेतील बुरुंडी देशामध्ये अज्ञात व्हायरसमुळे लाखो लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हायरसमुळे नाकातून रक्तस्राव होतो आणि 24 तासांच्या आत संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होतो. या व्हायरसची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे अशी आहेत. तसेच, देशातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी या व्हायरसला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीच इबोला आणि मारबर्ग असल्याचे नाकारले आहे. दरम्यान, स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन लोकांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणल्यानंतर आरोग्य अधिकार्यांनी बाजीरो परिसर क्वारंटाइन केला आहे. द मिररमधील एका रिपोर्टमध्ये मिगवा आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, या रोगाच्या संक्रमणामुळे रूग्णांचा लगेच मृत्यू होतो.
बुरुंडीच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, हा व्हायरस संसर्गजन्य रक्तस्रावी बग असल्याचे दिसते. या महिन्याच्या सुरुवातीला, बुरुंडीच्या शेजारील देश टांझानियाने मारबर्गला महामारी घोषित केली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने टांझानियाच्या शेजारील देशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मारबर्ग व्हायरसने दक्षिण आफ्रिकेतील गिनी या देशात कहर केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, मारबर्ग व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत सुमारे 12 मृत्यू झाले आहेत. तसेच, आणखी 20 रुग्ण या व्हायरसच्या विळख्यात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला टांझानियाच्या वायव्य कागेरा भागात मारबर्ग व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. दरम्यान,मारबर्ग हा एक व्हायरस आहे. जो एक प्राणघातक संसर्ग आहे. जो आफ्रिकेच्या काही भागांमध्ये मार्च 1967 मध्ये पहिल्यांदाच आढळला होता.