वॉशिंग्टन : उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी करून भलेही आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असेल; पण आंतरराष्ट्रीय पातळीवर याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्तर कोरियाच्या या चाचणीविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदाय एकवटला असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. व्हाईट हाऊसचे मीडिया विभागाचे सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदाय या घटनेमुळे आणखी एकवटला आहे. चीन आणि रशियासारख्या उत्तर कोरियाच्या सहयोगी देशांनीही या घटनेचा निषेध केला आहे. गत १५ वर्षांत अशाप्रकारे अणुचाचणी करणारा उत्तर कोरिया हा एकमेव देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय दायित्वाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा या देशाचे हे रेकॉर्ड प्रामुख्याने पुढे येईल, असेही ते म्हणाले. अमेरिकेने म्हटले आहे की, उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचेही उल्लंघन केले आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचारउत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतर दक्षिण कोरियाने उ. कोरियाच्या सीमेवर पुन्हा लाऊड स्पीकरद्वारे प्रचार सुरू केला आहे, तर दुसरीकडे अमेरिका चीनवर दबाव आणत आहे की, उत्तर कोरियाला अशा दुस्साहसापासून रोखावे. (वृत्तसंस्था)
‘उ. कोरियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकजूट’
By admin | Published: January 09, 2016 3:31 AM