Hezbollah Chief Naim Qassem: लेबनानची दहशतवादी संघटना हिजबुल्लाने जुन्या म्होरक्याच्या हत्येनंतर अखेर नवा प्रमुख निवडला. नईम कासीम हा हिज्बुल्लाचा नवा 'चीफ' असणार आहे. हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर जवळपास एक महिन्यानंतर हिजबुल्लाने आपला नवा नेता निवडला आहे. गेल्या महिन्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हसन नसरल्लाह मारला गेला होता. हिजबुल्लाने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, नईम कासिम हसन नसराल्लाहची जागा घेणार आहे. कासीम बराच काळ नसरल्लाहचा साथीदार म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूनंतर तो हिजबुल्लाचा कार्यवाहक प्रमुख म्हणून काम करत होता.
तीन दशकांनंतर बदलला 'चीफ'
हसन नसरल्लाह यांनी जवळपास तीन दशके या संघटनेचे नेतृत्व केले. नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुल्लाहने लेबनानमध्ये आपली संघटना मजबूत केली. आता हिजबुल्लाच्या निर्णय घेणाऱ्या शूरा कौन्सिलने दीर्घ विचारविनिमयानंतर नईम कासीमची नवीन नेता म्हणून निवड केली. विजय मिळेपर्यंत ते नसराल्लाहच्या धोरणांवर काम करत राहतील आणि अल-अक्सा आणि पॅलेस्टाइन जनतेला एकटे सोडणार नाहीत, असे हिजबुल्लाहने स्पष्ट केले. नसराल्लाहच्या हत्येला लेबनॉनमधील शिया समुदायामध्ये मोठा धक्का म्हणून पाहिले जात होते. कारण इस्रायलने नसराल्लाहच्या हत्येपूर्वी या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची हत्या केली होती. अशा परिस्थितीत नईम कासीम इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देण्यासोबतच आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.
लेबनानमध्ये इस्रायली सैनिकांचा खात्मा
आपल्या संघटनेच्या नेत्यांच्या हत्येनंतर, हिजबुल्ला देशात इस्रायली घुसखोरीशी लढा देत आहे. दररोज इस्रायली वस्त्यांवर रॉकेट आणि ड्रोन हल्ले करत आहे. वृत्तानुसार, गेल्या ३ दिवसांत हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील लढाईत 48 IDF सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही लेबनानवर हवाई हल्ले सुरूच ठेवले असून त्यामुळे १० लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत आणि २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.