ऑनलाइन टीम
न्यूयॉर्क, दि. १ -अमेरिकेने अंटार्क्टिका येथील एका पर्वताला भारतीय वंशांच्या वैज्ञानिकाचे नाव दिले आहे. वैज्ञानिक अखौरी सिन्हा यांच्या सन्मानार्थ माऊंट सिन्हा असे या पर्वताचे नाव ठेवण्यात आले आहे. जैविक संशोधनात मोलाचे योगदान दिल्याने सिन्हा यांचा सन्मान करण्यात आला आहे.
अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, सेल बायोलॉजी अँड डेव्हलपमेंटचे माजी प्राध्यापक अखौरी सिन्हा हे १९७१ - ७२ च्या दरम्यान अमुंडसेन आणि बेलिंगशॉसेन या सागरी भागात ग्लेशियर्स, पक्षी, मासे यांची सूचीबद्ध गणना करणा-या पथकात कार्यरत होते. सिन्हाच्या अतुलनीय योगदानासाठी अमेरिकेच्या अंटार्क्टिका नेम्स सल्लागार समिती आणि यूएस भूस्तरशास्त्र सर्वेक्षण विभाग यांनी अंटार्क्टिकातील एका पर्वताला सिन्हांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेतील या सन्मानानंतर तरुण पिढीला मार्गदर्शन करताना सिन्हा म्हणाले, तुमच्या कर्तुत्व आहे हे जगाला दाखवून द्या. प्रत्येक संधीचे सोने करा.
सिन्हा हे अलाहाबाद विद्यापीठातून बीएससी उत्तीर्ण झाले असून पाटणा विद्यापीठातून एमएसएसीचे शिक्षण घेतले. यानंतर अमेरिकेत जाण्यापूर्वी काही काळ ते रांची महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अंटार्क्टिका क्षेत्रात संशोधनासाठी भारत आणि अमेरिकेने एकत्र काम करावे असे सिन्हांनी सांगितले. माझ्या अनुभवाची भारताला आवश्यकता असल्यास सदैव मदतीसाठी तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.