Donald Trump Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. घटनास्थळी सुरक्षेत तैनात असलेल्या यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्याला जागीच ठार केले आहे. मात्र आता, तो कोण होता आणि कोठे रहायचा? या संदर्भातील माहिती समोर आली आहे. हल्लेखोराने साधारणपणे १२० मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत.
कोण आणि कुठला होता हल्लेखोर? -थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे हल्लेखोराचे नाव होते. तो २० वर्षांचा होता आणि पेनसिल्व्हेनियातील बेथेल पार्क येथील रहिवासी होता. बेथेल पार्क बटलरपासून साधारणपणे 40 मैल दक्षिणेला आहे. घटनास्थळावरून एक AR-15 सेमी-ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. बहुदा याच रायफलच्या सहाय्याने तरुणाने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रॅलीवर गोळीबार केला. यानंतर, यूएस सीक्रेट सर्व्हिसने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत हल्लेखोराच्या डोक्याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावरून हल्लेखोराने गोळीबार केला - डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला. बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्नायपरला निशाणा साधण्यात कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता.
न्यूयॉर्क पोलिसांनी शनिवारी (13 जुलै) या घटनेनंतर, ट्रम्प टॉवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत. त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे. तसेच, वर्दीधारी अधिकारी आणि एक पोलीस डॉग मॅनहट्टनच्या फिफ्थ एव्हेन्यूवर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गस्त घालत आहेत.