ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २३ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदर वक्तव्य करतानाच आपण कुठल्याही स्थितीत पाकिस्तान सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याच मुलाखतीत मुशर्रफ यांनी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला असून भारतविरोधी युद्धाची भूमिका घेत पाकिस्तानच्या राजकीय पटलावर पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न मुशर्रफ यांनी केला आहे.
या मुलाखतीदरम्यान मोदींवर कडाडून टीका करतानाच वाजपेयींनी पाळलेली लक्ष्मणरेखा मोदी ओलांडत असून त्यांच्या सर्व भाषणांमधून पाकिस्तानविरोध स्पष्ट दिसतो. शांततेप्रकियेसंबंधी मोदी गंभीर नसून त्यांनी त्यांची भूमिका बदलणे गरजेचे आहे. ते त्यांच्या अटी पाकिस्तानवर लादू शकत नाहीत, असेही ते म्हणाले
भारत बलुचिस्तानात पाकिस्तानविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत मुशर्रफ यांनी पाकिस्तानही याला जोरदार प्रत्युत्तर काश्मिरमध्ये कारवाया करून देईल अशी धमकी त्यांनी दिली. पाकिस्तानातले लाखो लोक काश्मिरमधल्या आपल्या भावांना वाचवण्यासाठी भारतात घुसण्याची तयारी करत असल्याचे सांगताना आम्ही त्यांना थांबवलेले असल्याची धक्कादायक माहिती मुशर्रफ यांनी दिली. सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराबाबत बोलताना मुशर्रफ म्हणाले की पहिली आगळिक आम्ही काढली असा भारताचा आरोप आहे, तर पहिल्यांदा गोळीबार भारताने केला असा आमचा आरोप आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच राहतिल परंतु त्याबाबत काय चर्चा करणार, सत्य काय हे कोण ठरवणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आपल्याला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसल्याचे सांगतानाच पाकिस्तान हा आपला देश असून येथे आपले नातेवाईक,मित्र राहतात असे सांगत आपण पाकिस्तान सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असलेले मुशर्रफ यांच्यावर सध्या देशद्रोहाचा खटला सुरू आहे.