बीजिंग- लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा चीन कार्डचा वापर करत आहे. इतकंच नव्हे, तर पाकिस्तानबरोबरचा वाद वाढवणं हेसुद्धा मोदींची जनतेतील लोकप्रियता वाढवणं आणि मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा एक डाव असल्याचं चिनी मीडियानं म्हटलं आहे.चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून हा आरोप करण्यात आलेला आहे. ग्लोबल छापून आलेल्या लेखात म्हटलं आहे की, 11 एप्रिल ते 19 मेपर्यंत होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच भारत-पाकिस्तान वाद विकोपाला गेला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला. भारतानं गेल्या काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदला सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून असं वाटतं की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा पाकिस्तानबरोबर झालेल्या वादाचा वापर निवडणुकीसाठी करत आहेत.मोदींची जनतेतील लोकप्रियता वाढवण्यासाठी भाजपा असं करत असल्याचंही ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या लेखात म्हटलं आहे. जोपर्यंत युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत द्विपक्षीय संबंधांच्या मुद्द्याचा निवडणुकीत वापर करता येत नाही. चीन आणि भारतामध्ये काही मुद्द्यांवरून वाद आहे. परंतु हे कोणतंही संकट नाही. अशातच मोदी निवडणुकीतल्या मुद्द्यांवरून दिशाभूल करण्यासाठी चीन कार्डचा वापर करत आहेत. भाजपा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु भारतात वाढत असलेली बेरोजगारीमुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे.भाजपानं अनेक आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये भाजपाबद्दल असंतोषाची भावना आहे. म्हणूनच मोदी चीनचा कार्डचा वापर करून महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेची लक्ष विचलित करत आहेत. ग्लोबल टाइम्सच्या लेखानुसार, मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. तसेच भाजपासाठी या निवडणुका जिंकण कठीण असल्याचंही मत ग्लोबल टाइम्समधून मांडण्यात आलं आहे.
निवडणुका जिंकण्यासाठीच मोदी करतायत पाक अन् चीन कार्डचा वापर, चिनी मीडियाचा कांगावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 4:56 PM