पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटायला जेव्हा रशियाला गेले तेव्हा अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. अमेरिका मोदींच्या विधानांवर लक्ष ठेवेल, पण आता अमेरिकेने भारताची ताकद ओळखली आहे असं म्हटलं होतं. तसेच युक्रेन आणि रशियामधील युद्ध केवळ भारतच थांबवू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे अमेरिकेने मान्य केलं आहे. अमेरिकेने बुधवारी एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, भारतामध्ये व्लादिमीर पुतिन यांना युद्ध संपवण्यासाठी मनवण्याची क्षमता आहे. मोदींच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यानंतर अमेरिकेने हे विधान केलं आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरेन जीन-पियरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला विश्वास आहे की, भारताचे रशियाशी असलेले संबंध आम्हाला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनमधील युद्ध संपवण्याचा आग्रह करण्याची क्षमता देतात, परंतु ते संपवणं हे पुतिन यांचं काम आहे. पुतिन यांनी युद्ध सुरू केलं होतं आणि तेच ते संपवू शकतात.
जेव्हा नरेंद्र मोदींनी पुतिन यांना मिठी मारली तेव्हा झेलेन्स्की यांनी टीका केली. शांततेच्या प्रयत्नांसाठी हा मोठा धक्का असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुतीन यांना खुनी म्हटलं होतं. ते म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान मोदी पुतीन यांची भेट घेत होते, तेव्हा रशियन क्षेपणास्त्रे युक्रेनवर हल्ला करत होती.
रशियाने कीवमधील मुलांच्या रुग्णालयाला लक्ष्य केलं होतं. मोदींनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सोमवारी सकाळी रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या शहरांवर हल्ला केला. पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान मोदींनी युक्रेनमधील २९ महिने चाललेले युद्ध आणि त्यात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली.
निष्पाप मुलांच्या मृत्यूचा उल्लेख केला होता. निष्पाप मुलांच्या हत्येने त्यांचं मन दु:खी होतं असं पंतप्रधान म्हणाले. ज्या दिवशी पंतप्रधान पुतिन यांना रशियात भेटले त्याच दिवशी युक्रेनवर हल्ला झाला. यात ३७ जणांचा मृत्यू झाला असून १७० जण जखमी झाले आहेत.