वॉशिंग्टन : भारत व अमेरिका व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डाॅलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट उभय देशांनी समोर ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये भेट घेतली. त्यावेळी शुल्कांमध्ये कपात करतानाच विविध क्षेत्रांमधील व्यापाराची संधी वाढवण्यावरही चर्चा झाली.
संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यापारी संबंध वाढविण्याची ग्वाही दिली. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळ मिळेल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेत्यांनी 'मिशन ५००' समोर ठेवले आहे. याद्वारे २०३० पर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून तो ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. हे गाठण्यासाठी निष्पक्ष व्यापार अटींची आवश्यकता असेल, असे यात म्हटले आहे. २०२५ अखेरपर्यंत परस्पर लाभदायक, बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण करण्याची योजना जाहीर करण्यात आली. ही चर्चा पुढे नेण्यासाठी वरिष्ठ प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे.
अडथळे दूर करण्यासाठी उपायांचे स्वागतमुक्त व्यापार करारांमध्ये (एफटीए) दोन भागीदार आपापसांतील जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमाशुल्क काढून टाकतात किंवा कमी करतात. याशिवाय, ते सेवांमधील व्यापार वाढविण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नियम सुलभ करीत असतात. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत व अमेरिकेने एका व्यापार करारावर चर्चा केली होती; परंतु मुक्त व्यापार कराराच्या बाजूने नसल्याने बायडन प्रशासनाने त्याला स्थगिती दिली होती. दोन्ही नेत्यांकडून व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी त्वरित केलेल्या उपायांचे स्वागत केले.
भारताला देणार एफ-३५ लढाऊ विमाने भारत आणि अमेरिकेने १० वर्षांच्या संरक्षण भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्याची योजना आखली आहे. महत्वाच्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांच्या सहनिर्मितीसाठी दोन्ही देशांनी तयारी दर्शविली आहे. एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमानांसह अन्य संरक्षण सामुग्रीची अमेरिका भारताला विक्री करणार आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात भारत, अमेरिका लष्करी सहकार्य वाढविणार आहे.
मोदी माझ्यापेक्षा उत्तम वाटाघाटी करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा अधिक उत्तम पद्धतीने वाटाघाटी करू शकतात अशी प्रशंसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. ट्रम्प हे आपले घनिष्ठ मित्र असल्याचे विधान पंतप्रधान मोदी यांनी याआधी केले होते. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी परस्परांबद्दल गौरवोद्गार काढले.
निवेदनानुसार, अमेरिकेने भारताने अलीकडे घेतलेल्या उपायांचे कौतुक केले आहे. भारताने मोटारसायकल, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान उत्पादने आणि अमेरिकेच्या धातू उत्पादनांवरील शुल्क कमी केले होते. दोन्ही नेत्यांनी नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक संधी वाढविण्यावर सहमती दर्शविली.
चीनसोबतच्या सीमावादात मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारलाचीनबरोबर असलेल्या सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचा अमेरिकेने दिलेला प्रस्ताव भारताने नाकारला आहे, असे परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले. हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला त्रयस्थाची मदत नको असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, दोन देशांतील समस्या त्यांनीच सोडवावी. त्यात त्रयस्थ देशाने कोणतीही भूमिका निभावू नये असे भारताचे मत आहे.
मानवी तस्करांवर कठोर कारवाई हवी मानवी तस्करी करणाऱ्यांविरोधात एकजुटीने लढा देण्याची आवश्यकता पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत गुरुवारी केली. मोठी स्वप्ने दाखवून सामान्य कुटुंबातील लोकांना अवैधरित्या दुसऱ्या देशात नेले जाते. मानवी तस्करीची समस्या भारतापुरती मर्यादित नाही तर साऱ्या जगाला तिने ग्रासले आहे, असेही मोदी म्हणाले.