अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या घटनेचा निषेध केला आहे.
"माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी अत्यंत चिंतित आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. "मला पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. तो सुरक्षित आहेत हे जाणून मला आनंद झाला. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि रॅलीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे. जिल आणि मी ट्रम्प यांना सुरक्षितपणे एस्कॉर्ट केल्याबद्दल सीक्रेट सर्व्हिसचे आभारी आहोत. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. याचा निषेध करण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून संघटित झालं पाहिजे" असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, "मला पेनसिल्व्हेनियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही हे जाणून आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि या गोळीबारात जखमी झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. अशा प्रकारच्या हिंसाचाराला आपल्या देशात स्थान नाही. आपण सर्वांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध केला पाहिजे आणि या घटनेमुळे आणखी हिंसाचार होणार नाही याची खात्री करण्यासाठी आपली भूमिका बजावली पाहिजे."